पुणे : राज्यासह पुणे शहरात थाटामाटात, मोठ्या प्रमाणावर खर्च करून विवाहसोहळे पार पडत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी अनेकजण लग्नसमारंभांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यात आकर्षक सजावट, शाही जेवण, मान्यवरांची उपस्थिती आणि लग्नाआधीच्या शूटींगचा समावेश आहे. मात्र, असं असलं तरी दुसऱ्या बाजूला पुणे शहरात या वर्षभरात जवळपास 5 हजार 500 जोडप्यांनी कोर्ट मॅरेज अर्थात नोंदणी विवाह केल्याचं समोर आलं आहे.
लग्न हे सर्वसाधारणपणे एकदाचं होतं आणि आयुष्याच्या या महत्त्वाच्या वेळेस लग्न करणाऱ्या मुलगा मुलीच्या कुटुंबातील सर्वांनी एकत्र यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्न समारंभाच्यावेळी कोणीही नाराज होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. सध्या तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून लग्न करत असल्याचं एकीकडे पाहायला मिळत आहे. मात्र, काही लोक कायदेशीर पध्दतीनं कमी खर्चात कोर्ट मॅरेज करतानाही पाहायला मिळत आहे. पुणे शहारत दर महिन्याला जवळपास 250 ते 300 जोडपी कोर्ट मॅरेज करत आहेत तर या वर्षात एकूण 5 हजार 500 जोडप्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचं समोर आलं आहे.
अशी करू शकता नोंदणी : याबाबत विवाह अधिकारी संगीता जाधव म्हणाल्या, "आमचं कार्यालय हे पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात असून आमच्याकडे स्पेशल मॅरेज ॲक्ट-1954 अंतर्गत जी विवाह नोंदणी केली जाते त्याची नोंद होते. जानेवारी 2024 ते आत्तापर्यंत जवळपास 5 हजार 500 विवाह नोंदणी झाल्या आहेत. विवाह नोंदणीसाठी संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन झाली असून कोणत्याही धर्माचे आणि समाजाचे लोक हे लग्न करू शकतात. शासनानं जी काही वेबसाईट दिली आहे, त्या वेबसाईटवरून विवाह नोंदणी करता येते. कोर्ट मॅरेजसाठी स्पेशल मॅरेज ॲक्ट-1954 असून त्या अंतर्गत कोर्टात मॅरेज ऑफीसरच्या देखरेखीखाली विवाह केला जातो. या लग्नात कोणत्याही प्रथा नसतात. ऑनलाईन अर्ज करत असताना जी काही कागदपत्रं लागतात त्याबाबत देखील माहिती तिथे उपलब्ध असते. अर्ज केल्यावर 4 दिवसात त्या अर्जाचं व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर नोटीस जनरेट केली जाते. कायद्यानं नोटीस पीरियड हा 1 महिन्याचा असतो. पक्षकार हे तारीख ठरवून रजिस्टर करू शकतात. त्यांना लगेच मॅरेज सर्टिफिकेट दिलं जातं."
नोंदणी सर्टिफिकेटवर क्यू आर कोड : संगीता जाधव पुढे म्हणाल्या, "मॅरेज सर्टिफिकेट दिलं जातं, त्या सर्टिफिकेटचा शासनाच्या वतीनं क्यू आर कोड दिला जातो. हा कोड स्कॅन केल्यास पक्षकाराला संपूर्ण सर्टिफिकेट मिळतं. तसंच विवाह कार्यालय हे देखील संपूर्णपणे कॅशलेस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण जी काही नोंदणी केली जाते ती ऑनलाईन केली जाते. या प्रोसेसची रक्कम देखील ऑनलाईन भरली जाते."
कोर्ट मॅरेजकडे कल वाढला : "एकीकडे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून लग्न समारंभ होताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होताना पाहायला मिळत आहे. कोर्ट मॅरेजबाबत मागील 2 वर्षाची माहिती घेतली, तर 2023 साली वर्षभरात ऑनलाईन आणि ऑफलाईन असं मिळून जवळपास 4 हजार कोर्ट मॅरेज झाले होते. तर यावर्षी 20 डिसेंबरपर्यंत जवळपास 5 हजार 500 कोर्ट मॅरेज झाली आहेत. सध्या नागरिकांमध्ये खर्च न करता साध्या पद्धतीनं लग्न करण्याबाबत जनजागृती वाढत आहे. गेल्या वर्षभरात नागरिकांमधील जागरूकता पाहायला मिळत असून नागरिक आता साध्या आणि सोप्या पद्धतीनं तसंच कोर्ट मॅरेजनं लग्न करण्यास पसंती देत आहेत," अशी माहिती यावेळी संगीता जाधव यांनी दिली.
दर महिन्याला 250 ते 300 कोर्ट मॅरेज : संगीता जाधव पुढे म्हणाल्या, "आमच्या इथं दरमहिन्याला 250 ते 300 कोर्ट मॅरेज होत असतात. तसंच एखाद्या विशिष्ट मुहूर्ताच्या वेळेस या संख्येत वाढ होत असते. या वर्षी 5 हजार 500 कोर्ट मॅरेज झाली आहेत. कोर्ट मॅरेज करण्यासाठी मुलगा आणि मुलगी सज्ञान असले पाहिजे. तसंच मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त तर मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. तसंच कोर्ट मॅरेजसाठी सर्वकाही ऑनलाईन असल्यानं याबाबत जी काही नियमावली आहे, ती देखील वेबसाईटवर देण्यात आली असून योग्य अर्ज भरल्यावरच नोंदणी होत असते.
हेही वाचा