वर्धा - येथील अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कात्री गावात पोलीस कर्मचारी आणि मासेविक्रेत्यांमध्ये वाद झाला. या वादात मासेविक्रेत्यांनी आणि गावकऱ्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलाच चोप दिला आहे. सचिन सुरकार आणि राजरत्न खडसे, अशी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यावेळी ते दोघेही कर्तव्यावर नसल्याचे बोलले जात आहे.
कात्री येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. यावेळी मासे विक्रेते मासे विक्री संपल्या नंतर हिशोब करतात. यावेळी सचिन सुरकार आणि राजरत्न खडसे यांनी विक्रेत्यांना तुम्ही जुगार खेळत आहेत, असे म्हणत त्यांच्याकडुन पैसे हिसकावले. यावेळी मासेविक्रेत्यांनी त्यांना समजावूनही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी मासे विक्रेत्यास मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी गावकरी देखील हा प्रकार पाहत होते. त्यांनी देखील पोलीस कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांचा आणि मासे विक्रेत्यांचा पारा चढला आणि त्यांनी या पोलीसांना चांगलाच चोप दिला.
सदर मासे विक्रेत्यांनी ही माहिती स्वत: पोलीस स्टेशनला दिली. तेव्हा हे दोघेही त्यावेळी कर्त्यव्यावर नसल्याचे समजले. मात्र, काहीजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण डांगे यांनी दिली.
या प्रकरणात दोषींवर कारवाई करा, अशी मागणी भोई समाज क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हजारे यांनी केली. तसेच पोलीस अधीक्षक याना निवेदन देणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
आष्टीतही पोलीस कर्मचाऱ्याला अज्ञाताकडून मारहाण
अशाच प्रकारची दुसरी घटना आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारसवाडा शिवारात २७ एप्रिलच्या रात्री घडली. यात तळेगाव पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावून आष्टी येथे परत जात असताना निलेश पेटकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या तोंडाला कापड बांधून अज्ञातांनी मारहाण केली. यात पेटकर यांना थोडी दुखापत झाली. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.