वर्धा - पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर वर्धा पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्तपणे दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाई ऐरवी दारू विक्रेत्यांवर होत असते. पण, या कारवाईत विक्रेत्यांसह तब्बल १६ तळीराम आणि २ विक्रेते अशा १८ जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी दारू अड्ड्याचा मालक पोलिसांच्या तावडीत सापडला नसून त्याचा शोध सुरू आहे. रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील पोद्दार बाग येथील राजेश जयस्वाल याच्या दारू अड्ड्यावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वर्ध्यातील राजेश जयस्वाल मागील अनेक वर्षांपासून दारूचा व्यवसाय करतो. मात्र, पोलिसांवरच आरोप करण्यासाठी प्रसिध्द झाल्याने सहसा त्याचावर कारवाई करण्यास पोलीस कर्मचारी धजावत नव्हते. पण, नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना सूचना मिळाली. यानंतर शास्त्री चौकात राजरोसपणे सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावरच धाड टाकण्यात आली. यावेळी दारू विक्रेता हाती न लागता चक्क दारू पिणारे १६ तळीरामच पोलिसांच्या हाती लागले. यावेळी मुख्य दारू विक्रेता राजेश जयस्वाल हा त्या ठिकाणी नसल्याने त्याच्यासाठी दारू विक्रीचे काम करणारे देवेद्र गौरीशंकर रूसिया (वय ३२ वर्षे, रा. गौरक्षण वार्ड, वर्धा) आणि संतोष दादारावजी ढोक (वय ४६ वर्षे, रा. पोद्दार बगीचा, वर्धा) हे दोघे मिळून आले. हे दोघेही दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांना दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात देशी, विदेशी दारू, बियर बसण्याची व्यवस्था करून विकत होते. यावेळी त्या ठिकाणी १६ ग्राहक दारूचे सेवन करत असताना मिळून आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ताब्यात ठेवण्यात आले आहे.
या कारावाईमध्ये घरांची झडती घेतली असता विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून एकूण सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम ६८, ६५ (ई), ७७ (अ), ८१, ८३, ८४, ६६(१)(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दारू अड्डाचालक आरोपी राजेश जैस्वाल याचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक सुभाष बोडखे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पंकज पवार, आशिष मोरखेडे तसेच पथकातील पोलीस कर्मचारी निरंजन वरभे, सलाम कुरेशी, संतोष दुर्घडे, राजू जयसिंगपूर, प्रदीप वाघ, श्रीकांत खडसे, चंदू बुरांगे, राजू तिवस्कर, नवनाथ मुंडे, राकेश आष्टनाकर, विकास अवचट, संघर्षण कांबळे, सुधीर माथानकर यांच्या पथकाने केली.