वर्धा - तापमानाचा पारा वाढत असताना आगीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. या घटनांमध्ये जीव मात्र मुक्या प्राण्यांचा जात आहे. जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील दौलतपूर गावातील गोठ्याला लागलेल्या आगीत १२ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३ बकऱ्या जखमी झाल्या आहेत. घटनेत देवराव रोगे या शेतकऱ्याचे शेती साहित्यही जळून खाक झाले. बकऱ्यांच्या मृत्यूने जोडधंद्याचेसुद्धा आर्थिक नुकसान झाले.
देवराव रोगे यांच्या शेतात गोठ्याला संध्याकाळी अचानक आग लागली. यावेळी शेतात कोणी नसल्याने गोठ्यातील 12 बकऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. शेतातील गोठ्यात ठेवलेला जनावरांचा चारा, ठिंबक सिंचनाच्या नळ्या जळून खाक झाल्या आहेत. सालदार धनराज मुन हे शेताकडे गेले असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. तोपर्यंत बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना गोठा जळाल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने शेतातील बैल हे गोठ्याऐवजी झाडाखाली बांधून ठेवले होते, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.