वर्धा : जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंत या गावात असलेली गौरी सुरेंद्र मोरे ही दहा वर्षाची चिमुकली परंतु या दहा वर्षाच्या चिमुकलीने जी कामगिरी केली आहे तिच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. गौरी हिने चक्क शंकरपटात बैल जोडी हाकली आहे. तळेगाव या ठिकाणी भव्यशंकर पटाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तीन दिवसांपासून या शंकरपाटाचा थरार या परिसरात असून या शंकरपटामध्ये मोठ्या प्रमाणात बैलांच्या जोड्या शर्यतीत दाखल झाल्या आहेत.
गौरीने हाकली बैलजोडी: गौरी मोरे हिने चक्क शंकरपटामध्ये बैलगाडी हाकली असून त्यामध्ये तिने अगदी कमी वेळेत अंतर पार करण्याचा विक्रम सुद्धा केला आहे. गौरी हिला तिच्या घरून म्हणजे तिचे आजोबा व तिचे बाबा तसेच तिची आई यांचा मोठा मुलाचा मार्गदर्शनाचा वाटा मिळत आहे. गौरीचे आजोबा अजबराव मोरे व भीमराव मोरे यांच्याकडून तिला या शंकर पटाचे धडे दिले गेलेले आहे. त्या तिचे वडील सुरेंद्र मोरे व आई शितल मोरे तसेच मोठे वडील महिंद्र मोरे व मोठी आई पल्लवी मोरे यांनी सुद्धा तिला मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन केले आहे.
गौरीचे सर्वत्र कौतुक: गौरी हिने शंकरपटामध्ये भाग घेऊन हजारो नागरिकांच्या समक्ष बैलगाडी अगदी सुसाट वेगामध्ये पळवली. गौरीही कृषक इंग्लिश प्राइमरी स्कूल तळेगाव येथील वर्ग पाचवीची विद्यार्थिनी असून या सर्व गोष्टीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरी तिच्या आईला घर कामात सुद्धा मदत करते. तसेच ती शेतात गेल्यानंतर बैलांना पाणी पाजणे, चारा खाऊ घालते व आजोबांनाही शेताच्या कामांमध्ये मदत करते. त्यामुळे घरी शेती असल्या कारणामुळे व गौरीचे आजोबा आजोबा मोरे भीमराव मोरे व तिचे वडील सुरेंद्र मोरे तथा मोठे वडील महेंद्र मोरे या सर्वांना शंकरपटामध्ये सहभागी होण्याची आवड असल्याकारणामुळे साहजिकच तिच्या मनामध्ये सुद्धा या गोष्टीचे कुतूहल निर्माण झाले असून यामध्ये तिने प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यामुळे या चिमुकलीचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
वडिलांचे मन भरून आले: गौरीने दहा वर्षाच्या वयातच शंकर पटामध्ये सुसाट वेगाने बैलाची जोडी चालवली असून विक्रमी वेळात तिने ती पार सुद्धा केली आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी, असे सांगितले जात आहे. गौरीने केलेला कामाची दखल अख्या गावाने घेतली असून तिचे सर्वत्र कौतुक गावकऱ्यांच्या वतीने केल्या जात आहे. तसेच शंकर पटांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी तसेच हजारो नागरिकांनी सुद्धा गौरीचे तोंडभरून कौतुक केले असल्यामुळे तिच्या वडिलांची आता मन भरून आले आहे.
हेही वाचा: Worli Koliwada Holi 2023: वरळी कोळीवाड्यात होळीसाठी आले आदित्य ठाकरे, घेतला पारंपरिक होळीचा आनंद