अकोला - बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या व्याळा येथे महिलेच्या खुनातील आरोपी आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाच्या खुनातील आरोपी, अशा दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
न्यू तापडिया नगरमधील नवनाथ मंदिर परिसरात पोलीस पाटील गणेश अडकणे व त्यांचे सहकारी फिरत होते. त्यावेळी त्यांना तिथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास हा मृतदेह गोपाल बाबुराव घरात यांचा असल्याचे कळाले. पोलिसांनी संशयित आरोपी मोनू उर्फ गजानन शिवहरी काकड याची चौकशी केली असता, त्याने आपणच हा खून केल्याचे कबूल केले आहे.
बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या व्याळा येथे छाया दिलीप गवई यांचा त्यांच्या घरात दोन दिवसांपूर्वी मृतदेह आढळला होता. या प्रकरणात बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या पथकाने या घटनेचा तपास लावून खुनाच्या आरोपीस अनिल रघुनाथ वानखडे यास अटक केली आहे.
या महिलेस विष देऊन मारण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर उपअधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील उपस्थित होते.