मुंबई - राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील नववी आणि अकरावीच्या वर्गात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांची फेर परीक्षा न घेता व्हीडिओ कॉन्फरेन्सद्वारे केवळ त्यांची तोंडी परीक्षा घेतली जाणार असून त्यानंतर त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठीचा जीआर शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
राज्यभरात ७ ऑगस्टपर्यंत या विद्यार्थ्यांना शक्य असेल, तेथे प्रत्यक्ष शाळेत बोलवून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षेचे आयोजन करावे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी मागील काही दिवसापासून महाराष्ट्राचे शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक परिषद आदी शिक्षक संघटनांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने जीआर काढल्याने नववी आणि अकरावीतील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इयत्ता नववी व अकरावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा ही परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकारने कोणताही आदेश दिलेला नव्हता. याबाबत मुंबई-ठाणेसह राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केले होते. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने शालेय शिक्षण विभाग विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
इयत्ता नववी व अकरावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळावी, यासाठी दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर त्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाला निर्णय घेण्यात अडचणी येत होत्या. त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे.
नववी आणि अकरावीच्या परीक्षा संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून निर्णय घेतला जात नसल्याने मुख्याध्यापकांना प्रश्न पडला होता. तर या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी पालकांकडून होत होती. परंतु याबाबत प्रचलित नियमांनुसार विद्यार्थ्यांचा निकाल लावावा, असे सरकारने स्पष्ट केले होते. यामुळे शाळांनी तसा निकाल लावल्याने प्रत्येक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे 8 ते 10 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
यामुळे या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला होता. या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना संधी देण्याची सूचना सरकारने केली आहे. यासाठी 7 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना शक्य असेल तेथे प्रत्यक्ष शाळेत बोलवून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षेचे आयोजन करावे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.