नेर्ले (सांगली) - वाटेगाव येथे 'इंडियन स्टार टॉर्टाइज' या प्रजातीचे अत्यंत दुर्मिळ कासव सापडले. वाटेगाव येथील अनिल जाधव यांना त्यांच्या शेतात हे कासव सापडले आहे. अतिशय छोटे आणि दुर्मिळ कासव पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. जाधव यांनी शिराळा वन विभागाशी संपर्क साधला आणि वन विभागाचे कर्मचारी अंकुश खोत यांच्याकडे कासव सुपूर्द केले आहे.
'इंडियन स्टार टॉर्टाइज' या प्रजातीचे कासव घरात ठेवल्यास भरभराट अन् नोकरी धंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
भारत आणि श्रीलंकेच्या 'ड्राय झोन'मधील प्रदेशात हे कासव आढळून येतात. भारतात आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील खेड्यांजवळील वनक्षेत्रात 'इंडियन स्टार टॉर्टाइज' कासव आढळतात. दक्षिण भारतामध्ये आढळणारे ही कासवे वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच, ती जवळ बाळगणे, पाळणे यावर ही बंदी आहे.