मुंबई : मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे तब्बल 370 झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सध्या रखडले आहेत. यातील बहुतांश प्रकल्प हे निधी अभावी रखडले असून आता लॉकडाऊननंतर बांधकाम क्षेत्र मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने 370 प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार सरकार आता स्ट्रेस फंडच्या नावाखाली या प्रकल्पांना 700 ते 1 हजार कोटींची मदत करणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज(गुरुवार) दिली आहे. हा निर्णय मोठा आणि झोपडपट्टीवासीयांसाठी दिलासादायक मानला जात आहे.
एसआरए प्रकल्प योजनेअंतर्गत मुंबईत मोठ्या संख्येने प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र यातील तब्बल 370 प्रकल्प गेली कित्येक वर्षे रखडली आहेत. यातील बहुतांश प्रकल्प हे पैसा, निधी नसल्याने रखडले आहेत. तर, काही प्रकल्पात वाद आणि इतर तांत्रिक अडचणी आहेत. पण हे प्रकल्प रखडल्याने झोपडपट्टी वासीयांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीमुक्त मुंबईवर भर देणे गरजेचे झाले आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेत सरकारने आता या रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 700 ते 1 हजार कोटींचा निधी सरकार यासाठी देईल. तर, अधिकचा निधी लागल्यास तो बँकाच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे आता रखडलेले प्रकल्प मार्गी लागून झोपडपट्टीवासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.