पणजी (गोवा) - गोवा मुक्त होऊन ६० वर्ष झाली आणि राज्याने ३५ व घटक राज्य दिन साजरा केला. मात्र या राज्याचे हित जोपासणारे असे पूर्णवेळ राज्यपाल गोव्याला द्यावेत आणि आम्हा गोमंतकीय जनतेला न्याय द्यावा. अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. दिगंबर कामत यांनी हे पत्र ट्विटही केले आहे.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पात्रातून गोवा सरकारवर निशाणा
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पात्रातून काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील भाजपवर निशाणा साधला आहे. ते या पात्रात म्हणतात कि, आज भाजप सरकारच्या बेजबाबदार व असंवेदनशील कारभारामुळे गोमंतकीय गुदमरत आहेत. गोमंतकीयांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी मागील कित्तेक महिने गोव्यात पुर्णवेळ राज्यपाल नाहीत. कोविड महामारीत गोवेकर संकटात आहेत. त्यातच तौक्ते चक्रीवादळाने गोमंतकीयांच्या संकटात आणखीन भर टाकली आहे. कोरोनाचा १५४४९ जणांना आतापर्यंत संसर्ग झाला असून २५९७ लोकांना मृत्यु आला आहे. गोव्यात भाजप सरकारने लोकांचा घटनात्मक जगण्याचा अधिकार हिरावून घेतल्याने गोवा राज्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरावर बदनामी झाली आहे. गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सुमारे ७५ लोकांचा बळी गेला आहे. असेही या पात्रात नमूद करण्यात आले आहे.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे कौतुक
विशेष म्हणजे या पत्रातून गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे कौतुक काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी या पत्रातून केले आहे. गोव्यातील म्हादई प्रश्न असेल किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा प्रश्न असेल त्यांनी घेतलेली भूमिका हि निर्णायक होती. त्यांनी गोमंतकीयांचे हित जपण्यासाठी वेळोवेळी पाऊले उचलली होती असे नमूद करत त्यांनी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या कारभाराकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत
मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री तसेच इतर मंत्रीगण एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्री परस्पर विरोधी विधाने करीत असल्याने लोकांमध्ये अविश्वास बळावला आहे. तौक्ते चक्रीवादळात सुमारे १४६ कोटींचे नुकसान झाले आहे. हा अंदाज मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केला आहे. बंद असलेला खाण व्यवसाय, ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय व आता कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जाहिर केलेला कर्फ्यु यामुळे लोक हवालदील झाल्याचे म्हणतानाच गोव्याची अर्थव्यवस्था पुर्णपणे कोसळली आहे. आज घटनात्मक अधिकार असलेले राज्यपाल पुर्णवेळ गोव्यात उपलब्ध नसल्याने, राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. याची आपण दखल घ्यावी असे कामात यांनी या पत्रात म्हटले आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या या पत्रावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामात यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचीही सही आहे.