ठाणे - प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीतील राजपथावर पार पडणारे पथसंचलन हे फक्त भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक आकर्षणाचा विषय आहे. देशाच्या सैन्यबळासोबतच इथे पथसंचलनामध्ये भारतातील अनेक संस्कृतींचेही दर्शन होते. या संचालनात यावर्षी महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही दर्शन झाले. संतांची अविरत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची एक सुरेख झलक या चित्ररथावर पाहायला मिळाली. ठाण्यात राहणाऱ्या युवक आणि युवतींची निवड यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी झाली ही गोष्ट ठाणेकरांना आणि महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे.
असा होता महाराष्ट्राचा रथ -
प्रजासत्ताक दिनी देशातील विविध राज्यांनी चित्ररथांच्या माध्यमातून सुरेख असे सादरीकरण राजपथावर केले. यामध्ये महाराष्ट्रही मागे नव्हता. संतांची आणि शिवबांच्या शूरवीरांची भूमी असणाऱ्या या महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये यंदाच्या प्रजासत्ताक दिनी 'संतवाणी'चा प्रभाव पाहायला मिळाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, अशा जयघोषात हा रथ राजपथावर आला आणि अनेकांचेच चेहरे खुलले. संतांची अविरत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची एक सुरेख झलक या चित्ररथावर पाहायला मिळाली. चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महारांजाची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मुर्ती समोर ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ दाखवण्यात आला होता. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फुट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या संतसंपदेची प्रचिती -
चित्ररथ आणखी निरखून पाहिल्यास महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या विठुरायाची कटेवर हात असणारी 8.5 फुट उंचीची लोभस मूर्ती नजरी पडत होती. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फुट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला होता आणि यावर संतांची सुवचने लिहण्यात आली होती. अतिशय सुरेख अशा या चित्ररथाला पाहताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संतसंपदा नेमकी काय, याचीच प्रचिती येत होती. चित्ररथाच्या दोन्ही बाजुंना विठ्ठलाच्या निस्सीम भक्त संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव महाराज, संत शेख महंमद, संत नरहरी महाराज, संत सावता महाराज, संत दामाजीपंत, संत गोरोबाकाका, शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज, संत सेना महाराज, संत चोखामेळा यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या होत्या.
हेही वाचा - घसरणीचा फटका! शेअर बाजार गुंतणुकदारांच्या संपत्तीत ११.५७ लाख कोटींची घट