ठाणे - देशात कोरोना विषाणूमुळे आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश घरात अडकून पडला आहे. यामध्ये जे रोजंदारीवर कामे करतात आणि एक दिवस काम केले नही तर चूल पेटणार नाही, अशा लोकांचे मोठे हाल होत आहेत. दोन घास अन्नाचा देखील आसरा नसलेल्या अशा लोकांना आता ठाण्यातील वर्तकनगर भागातील रुणवाल प्लाझा येथील मंडळींनी मदतीचा हात दिला आहे.
या संकुलातील अमित राय आणि मुकेश जैन यांच्यासोबत 25 ते 30 मित्र एकत्र येऊन दररोज 800 लोकांना जेवण पुरवत आहेत. हे सर्व अन्नदान ते स्वखर्चाने करत असून नवी मुंबई, घोडबंदर रोड पासून मोठ्या भागात त्यांचे हे काम चालते. आता या अन्नाचे पार्सल बनवून भुकेल्यापर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.