ठाणे - भिवंडीत मलनिस्सारण शुद्धीकरण केंद्राच्या टाकीत बुडून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. असिफ जियाउल सिद्दिकी (रा. अवचित पाडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
भिवंडी शहर पालिका क्षेत्रात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी अवचित पाडा भागात पालिकेच्या जागेत 23 एमएलडी क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्रासाठी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून टाकी बांधण्याचे काम सुरू आहे. या टाकीचे बांधकाम सुरू असताना यामध्ये साठवलेल्या पाण्यात पडून असिफचा मृत्यू झाला आहे.
भिवंडी महापालिकेकडून मल शुद्धीकरण केंद्राच्या भूमीगत गटारे व टाकीच्या बांधकामासाठी मे. ईगल कन्ट्रक्शन कंपनीने 35 बाय 40 लांबी-रुंदीचा व ३० फूट खोलीचा खड्डा खोदला आहे. या खड्ड्यातील साठलेल्या पाण्यात मित्रासोबत आसिफ आंघोळीसाठी गेला होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृत आसिफ हा चार महिन्यांपूर्वीच भिवंडीत आला होता त्याचे वडील पाव विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
दरम्यान आसिफच्या मृत्यूप्रकरणी मे ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जबाबदार आहे. त्या कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान यांनी केली आहे.