ठाणे- शहरातील लोक डेंग्यूने आजारी पडतात. मात्र, पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने लोकांचे जीव धोक्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या दुर्लक्षपणाचा विरोध करण्यासाठी आज ठाण्याच्या वर्तक नगर प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
'दरवर्षी पावसामुळे नाले साचतात. यात डेंग्यूची लागण करणाऱ्या डासांची निर्मिती होते. डेंग्यूमुळे शहरातील अनेक लोक आजारी पडतात. या आजारामुळे यावर्षी एका १३ वर्षीय बालिकेचाही मृत्यू झाला. मात्र, या सर्व बाबींकडे ठाणे महानगर पालिका दुर्लक्ष करत आहे. यावर ठाणे महानगर पालिकेचे प्रशासन कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही. महापालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे,' असे गिरी यांनी म्हटले आहे.
दरवर्षी डेंग्यू पीडितांची आकडेवारी लक्षात घेता, हा आजार भयंकर असून यावर उपाय योजना करण्यासाठी महापालिका असमर्थ असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप गिरी यांनी केला आहे. जर येत्या सात दिवसात पालिका प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना केली नाही, तर आठव्या दिवशी ठाणे युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा गिरी यांनी दिला आहे.