नवी मुंबई - पेण येथून वाशीमध्ये फिरण्यासाठी आलेल्या तरुणावर खारघरमध्ये गोळीबार करण्यात आला. काल रात्रीच्या वेळी लुटण्याच्या उद्देशाने तरुणावर अशा प्रकारे हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - फूस लावल्याने पळाली मुंब्र्यातील अल्पवयीन मुलगी; झाशीमध्ये ताब्यात
प्रतिक रविंद्र आहेर (वय 24) नावाचा पेणमध्ये राहणारा इस्टेट एजंट 23 तारखेला दुपारी 3 वाजता पेण येथून वाशी, नवी मुंबई येथे त्याच्या दुचाकीने (क्र. एम.एच झिरो 06 बी.एच 6399) फिरण्यासाठी आलेला होता. रात्री 11 च्या दरम्यान वाशी येथून सायन पनवेल महामार्गाने पनवेलकडे जाताना कोपरी गाव बस स्टॉपच्या मागील रोडवर सिगरेट पीत असताना त्या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्तींनी त्याच्याकडे मोबाईल, पैसे व दुचाकीची मागणी केली. मात्र, प्रतिक यांने यास विरोध केल्याने एकाने जबरदस्तीने त्याच्यापासून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता एका आरोपीने प्रतिकच्या डाव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली व पळ काढला.
तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
प्रतिक याच्या पायाला गोळी लागल्याने जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना कळवले. त्याला उपचारासाठी सिटी हॉस्पिटल, खारघर, सेक्टर 7 येथे नेण्यात आले. सध्या प्रतिकवर एमजीएम कामोठे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास खारघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हे करीत आहे.
हेही वाचा - ठाण्यात पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन; पोलिसांनी घेतला लाभ