मुंबई - कोपरखैरणेत हायव्होल्टेज करंट असलेल्या वायरचा स्फोट(स्पार्क होऊन) झाला. या घटनेत शुभम सोनी(वय 20) हा तरुण भाजला आहे. कोपरखैरणेतल्या सेक्टर 5 मध्ये ही घटना घडली आहे.
शुभम कॉलेजला जात होता. तेव्हा रस्त्याच्या बाजूला हायव्होल्टेज करंट असलेल्या वायरचा स्फोट झाला. याची ठिणगी शुभमच्या कपड्यावर पडून त्याच्या पॅन्टला आग लागली. यात शुभम कंबरेपासून खाली भाजला आहे. स्थानिक नागरिकांनी आग विझवून शुभमला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - वाशीनाका येथे मोनोरेल पडली बंद; प्रवासी अडकले
नवी मुंबईत यापूर्वीही अनेक ठिकाणी महावितरणाचे खांब कोसळण्याच्या आणि रस्त्यावर तार तुटून पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. काहींचा जीव गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अनेक भागात 'महावितरण'चे उघडे फीडर, जमिनीखालील उघड्या पडलेल्या वाहिन्या दिसतात. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.