नवी मुंबई - कोपरखैरणे येथे राहणाऱ्या इंजिनिअर तरुणाला लॉकडाऊनमुळे एकाकी पडल्याच्या कारणामुळे नैराश्य आले आणि आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, की मी घरात एकटाच पडलो होतो त्यामुळे मला हे घर खायला निघाले होते. खूप मित्रांना फोन करायचो मात्र, त्यामुळे त्यांची उलट जास्त आठवण येत राहायची. मी माझ्या स्व-इच्छेने आत्महत्या करत असल्याचेही त्याने लिहिले आहे.
नवी मुंबईतील कोपरखैणे येथे सुरज सखाराम सुर्वे (वय 27) हा इंजिनिअर तरुण मोठा भाऊ वहिनी यांच्यासोबत राहत होता. सूरज हा अविवाहित असून त्याचे आई-वडील गावी राहत होते. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच भाऊ वहिनी गावी गेले होते व लॉकडाऊनमुळे तेथेच अडकले होते त्यामुळे सूरज हा एकटाच भावाच्या घरात राहत होता. लॉकडाऊन वाढल्यामुळे त्याला गावीही जाता आले नाही त्यामुळे दिवसेंदिवस खचून गेला होता. भाऊ वहिनीने गावाला जाताना शेजारी राहणार्या नातेवाईकांकडे सूरजच्या जेवणाची सोय केली होती त्यामुळे या नातेवाईकांच्या घरून, सुरजला दररोज जेवणाचा डबा येत होता.
आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान सूरजचे नातेवाईक जेवणाचा डबा घेऊन आले असता, बराच वेळ दार ठोठावून त्यांना आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलाविले पोलिसांनी दरवाजा तोडला असता, आतील दृश्य पाहून सगळेच हादरून गेले. सुरजने घरातील जिन्याच्या स्टीलच्या पाईपला दोर बांधून आत्महत्या केली होती. आजूबाजूला शोध घेतला असता पोलिसांना जवळच एक सुसाईड नोट सापडली.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी -
"मी लॉकडाऊन मुळे खूप दिवस एकटा रहातोय या घरात. हे घर मला एकट्याला खायला उठलं आहे. सगळ्यांची खूप आठवण येते, आठवण आली तर एकटाच रडत बसतो, वरून कितीही खुश दिसत असलो तरी आतून खूप खचून गेलो आहे. दिवसभर फोन वर तरी किती बोलणार, फोन वर बोलल्या वर जास्त आठवण येऊन, रडत बसायचो. घरच्यांपासून अजून किती दिवस दूर राहावं लागणार म्हणून मी माझ्या इच्छेनुसार आत्महत्या करीत आहे अशा आशयाची चिट्ठी लिहून सुरजने आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.