ठाणे - भिवंडी तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. वारंवार तक्रारी व मागण्या करूनही प्रशासन कृती करत नसल्याने संतप्त होत श्रमजीवी संघटनेने आंदोलन केले. गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांच्या दालनात आलेल्या शिष्टमंडळाचे आंदोलनात रूपांतर झाले. चार तास सुरू असलेल्या या आंदोलनात ठोस कृती कार्यक्रम आणि लेखी पत्र घेऊन आंदोलन थांबवण्यात आले.
खाजगी माणसाकडून पाणी बिलाची वसुली
पाण्याचे प्रलंबित प्रश्न सोडवावे तसेच जागतिक बँकेच्या योजना ताब्यात घेऊन बोगस पाणीपट्टी वसुली करणाऱ्या खाजगी लोकांवर गुन्हे दाखल करण्याची संघटनेची मागणी यावेळी केली. शिरोळे ग्रामपंचायत हद्दीत जगातील बँकेच्या जुन्या पाणी योजना गावातील काही खाजगी मंडळींनी हस्तांतरित केल्या आहेत. कोणतेही शासकीय अंकुश नसताना खाजगी माणसं वसुली करतात, याबाबत आज संघटनेने आवाज उठवला, व पोलीस कारवाईची मागणी केली, पंचायत समिती प्रशासनाने पोलिसांना पत्र दिल्याचे लेखी संघटनेकडे सुपूर्द केले. यासह गाणे फिरीग पाडा, मोहिली, कुशिवली, कुरुंद, दलोंडे काटइ, खोनी इत्यादी गावांचे प्रश्न होते.
पाणी पुरवठा विभाग उपअभियंता डी. आर. कांबळे यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रार देऊनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवक प्रमुख प्रमोद पवार, जिल्हा शेतकरी प्रमुख संगीता भोमटे,जिल्हा कातकरी प्रमुख जयेंद्र गावित तालुका अध्यक्ष सुनील लोणे, शहर तालुका अध्यक्ष सागर देसक,सचिव जया पारधी, सचिव मोतीराम नामकुडा ,आशा भोईर,उपाध्यक्ष तानाजी लाहंगे, उज्वला शिंपी, किशोर हुमने, प्रदीप चौधरी, गुरुनाथ जाधव,विजय राऊत, गणपत मते, चंद्रकांत मते इत्यादीसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
हेही वाचा - पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…