ठाणे - घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट नजीकच्या क्वांटम या निर्माणाधीन इमारतीच्या सर्व्हिस लिफ्टमध्ये चिरडून मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
हेही वाचा - अयोध्या जमिनीबाबत न्यायालयाच्या निकालाचे सर्वांनी स्वागत करावे - माधव गोडबोले
अभिषेक विश्वकर्मा (वय २५) असे या मृत मजुराचे नाव आहे. हिरानंदानी इस्टेट गृह संकुलानजीक क्वांटम या १८ मजल्याच्या इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या १५ व्या मजल्यावर सर्व्हिस लिफ्टमधून इमारतीचे काम करीत असताना विश्वकर्मा लिफ्टमध्येच अडकून पडला. त्याची सुटका करण्यासाठी घटनास्थळी ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाचे जवान आणि कासारवडवली पोलिसांचे पथक सर्व सामुग्रीसह दाखल झाले.
मात्र, विश्वकर्मा याची मान लिफ्टमध्ये अडकल्याने सुटका करण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.