ठाणे - महिलेच्या घरात घुसुन तीक्ष्ण हत्याराने तिचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ४ च्या २६ सेक्शन परिसरातील एका घरात घडला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विद्या तलरेजा (वय ४०) असे निर्घृण हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दुसरीकडे या महिलेच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या २६ सेक्शन परिसरात मृत विद्या तलरेजा राहत होती. तिच्या सोबतच त्यांची मुलगी राहते. त्यातच शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी विद्याच्या घरात शिरून तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर सपासप वार केले त्यानंतर दगडाच्या साहाय्याने तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती एसीपी टिळे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. ही हत्या कोणी आणि का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी मात्र संशयित दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.