नवी मुंबई - जनतेला भेडसावत असणाऱ्या विविध समस्या विरोधात महिला काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. वाहतूक विभाग, नवी मुंबई महानगर पालिका, पोलीस प्रशासन यांच्या विरोधात महिला काँग्रेसने रविवारी आंदोलन केले. कोपरखैरणे येथील डीमार्टसमोर नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
नवी मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे. कोपरखैरणे रेल्वे स्टेशन आवारात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विविध ठिकाणी बेवारस वाहने पडून आहेत. अनाधिकृत बॅनरबाजी सुरू आहे. वाढीव बांधकामे सुरू असून मनपा प्रशासन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही.
हेही वाचा - ठाणे: वेश्या व्यवसायासाठी बळजबरी करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात नवविवाहितेची पोलिसांकडे तक्रार
कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात अनाधिकृत रिक्षा थांब्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शाळा कॉलेजच्या समोर मोठ्या प्रमाणात अनाधिकृत वाहन पार्किंग तसेच रस्त्यावर दुतर्फा पार्क केलेली वाहने या सारख्या अनेक समस्यांना कोपरखैरणे येथील जनतेला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रश्नांबाबत अनेक वेळा कोपरखैरणे मनपा, वाहतूक विभाग, पोलीस यांना पत्रव्यवहार केला असता जनतेचे प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे नवी मुंबई काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई-नाशिक महामार्गावरील उड्डाण पुलावर धावत्या कारला आग; जीवितहानी टळली
येत्या काळात हे प्रश्न मार्गी न लागल्यास नवी मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महिला काँग्रेस अध्यक्षा उज्वला साळवे यांनी दिला आहे.