ठाणे - साडी विकण्याच्या नावाखाली महिलांना गंडा घालणाऱ्या एका नटवरलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. अनिता गावंडे असे या आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेने आतापर्यंत 3 कोटी 13 लाखांचा गंडा घातला आहे.
कल्याण-पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात असलेल्या सुशील अर्पाटमेंटमध्ये आरोपी अनिता गावंडे नावाची एक महिला राहते. ही महिला सुरुवातीला स्वतःच्या घरातून साडी विक्रीचा व्यवसाय करत होती. त्यानंतर तिने इमारतीत साडी विक्रीचे दुकान थाटले. साड्यांची विक्री करता करता तिने अनेक महिलांशी मैत्री केली. त्यानंतर आरोपी अनिताने संपर्कात आलेल्या या सर्व महिलांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. फॉरेन एक्सचेंज मनी करन्सीमध्ये पैसे गुंतविल्यास पैसे दुप्पट होतात, असे अमिष तिने या महिलांना दाखविले. या अमिषाला भुलून अनेक महिलांनी अनिता गावंडेकडे पैसे गुंतविले. मात्र, 2018मध्ये काही गुंतवणूकदारांना त्यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यामुळे या महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी केल्या.
हेही वाचा - विशेष: बाधितांच्या बेजबाबदारपणाने वाढतोय अमरावतीत कोरोना
दुष्कृत्यात महिलेच्या पतीचाही सहभाग -
कालांतराने यातील बऱ्याच महिला आणि त्यांची कुटुंबे अन्य ठिकाणी स्थायिक झाली. मात्र, स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त ठाणे आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अनिताला तब्बल अडीच वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांच्या पथकाने आरोपी अनिता हिला कल्याण न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणी कोर्टाने आरोपी अनिता हिला अधिक चौकशीकरिता 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष या दुष्कृत्यात महिलेच्या पतीचा देखील सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
आमचे पैसे लवकर परत मिळतील, यासाठी प्रयत्न -
आमचा विश्वास संपादन करुन आमच्याकडून लाखो रुपये घेतले गेले आहे. आता अटक झाल्यानंतर पोलिसांनी ठोस कारवाई करत आमचे पैसे लवकर परत मिळतील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी फसगत झालेल्या गुंतवणूकदार महिलांनी दिली.