ठाणे - रेल्वेमधून एका प्रवासी महिलेची पर्स जबरदस्तीने लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याचा थरारक पाठलाग करून लोहमार्ग क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने त्याला जेरबंद केले आहे. इम्रान अली हुसेन सिद्धीकी (वय- 26) असे या चोरट्याचे नाव असून तो टिटवाळा परिसरातील रहिवाशी आहे.
गुरुवारी सकाळी कल्याण रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 4 व 5 वर क्राईम ब्रँचचे पथक गस्त घालत होते. इतक्यात फलाट क्र. 6 वर थांबलेली जोधपूर-बंगळूरू एक्सप्रेस सुरू होताच एक व्यक्ती पर्स खेचून उडी मारत पळून जात असताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याची रेल्वे ट्रॅकवरच त्याला पकडले. चौकशीदरम्यान स्वतःचे इम्रान अली हुसेन सिद्धीकी नाव सांगणाऱ्या या चोरट्याकडे प्रवासी महिलेची लंपास केलेली पर्स सापडली.
पर्ससह इतरही मुद्देमाल जप्त
या चोरट्याकडून क्राईम ब्रँचने लेडीज पर्ससह 43 हजार 119 रूपये किमतीचे चांदीचे दागिने, 5 मोबाइल फोन व काही रोख रक्कम हस्तगत केली. या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी शेख, जमादार पवार, कर्डिले, माने, चव्हाण, सुरवसे, पाटील, कल्याण आरपीएफचे सैनी, जितेंद्र सिंग, योगेश कुमार यांनी केली. या चोरट्याकडून प्रवाशाच्या बॅगा लंपास करण्याचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून लोहमार्ग पोलीस त्यादृष्टीने सखोल तपास करत आहेत.
हेही वाचा -एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना NIA ने केली अटक, मनसुख हिरेन खुनाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप