नवी मुंबई - पनवेलमधील कोन येथील विलगीकरण कक्षात असणाऱ्या 40 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना 16 जुलैला घडली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आज याठिकाणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि चित्रा वाघ यांनी भेट दिली. महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना राज्याचे गृहमंत्री काय करतात? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. तसेच गृहमंत्री कधी जनतेची माफी मागतील? असेही ते म्हणाले.
पनवेलमधील कोन गावातील इंडिया बुल्स येथील विलगीकरण कक्षात एका व्यक्तीला पाच दिवसांपूर्वी दाखल केले गेले होते. संबधित व्यक्तीचा भाऊ हा डबा घेऊन येत होता. भावाच्या शेजारच्या खोलीत एका 40 वर्षीय महिलेला विलगीकरण कक्षात ठेवले होते. भावाला डबा घेऊन आलेल्या व्यक्तीने महिला ज्या खोलीत होती त्या खोलीचा चुकून दरवाजा ठोठावला होता. त्यातून त्यांची ओळख झाली. त्यानंतर संबधित व्यक्तीला लक्षणे जाणवल्याने त्यालाही त्या विलगीकरण कक्षात दाखल करून घेतले. गुरुवारी संध्याकाळी संबधित व्यक्ती महिलेच्या खोलीत शिरला. आपण डॉक्टर आहोत, असे सांगून काही समस्या आहेत का? विचारत बलात्कार केला. महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल न आल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. या घटनेच्या निषेधार्थ इंडिया बुल्स येथे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपा नेत्या चित्रा वाघ, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते. या घटनेसंदर्भात सर्वांनी तीव्र निषेध व्यक्त केला.