ठाणे - कोणत्याही उपचारासाठी आधी कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असल्याच्या सूचना आरोग्य विभागाच्यावतीने सर्व रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. मात्र, याचा फटका एका गरीब महिलेला बसला आहे. तिच्याकडे कोरोना चाचणीकरिता पैसेच नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. तरीही रविवारी रात्री तिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्याने तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र रस्त्यातच तिची प्रसुती झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरत असून त्याचा मोठा फटका गोरगरिबांना बसत असल्याचे चित्र आहे. अशीच एक घटना रविवारी रात्री मुंब्रा येथे घडली. 'कोरोनाची टेस्ट करून या,' असे या गर्भवती महिलेला सांगण्यात आले. मात्र, ही चाचणी करण्याकरिता पैसेच नसल्याने तिला पुन्हा रुग्णालयात नेता आले नाही. कोरोना चाचणीसाठी जवळ पैसे नाहीत आणि प्रसुतीचे दिवस भरत आले, असल्याने काय करावे अशा द्विधा मनस्थितीत हे दाम्पत्य होते. यातच, रविवारी रात्री अचानक या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने तिला चालतच कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले. दरम्यान, काही अंतर गेल्यावर तिच्या पोटात प्रचंड दुखू लागले व काही कळायच्या आतच तिने रस्त्यातच एका बाळाला जन्म दिला. तिची ती दयनीय अवस्था पाहून जवळच्या नूर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकेने धाव घेत या महिलेची मदत केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, कोरोनासारख्या परिस्थितीत आम्हालाही या रोगाचा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे आम्हाला सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी येथील डॉक्टर आणि नर्स यांनी केली आहे.