ठाणे : शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कल्याणहून नगरच्या दिशेने ही महिला बसमधून प्रवास करत होती. ( Bad road conditions in Thane) वरप गावाजवळील दुर्गानगर समोर बस आल्यानंतर या महिलेच्या पोटात कळा येऊ लागल्या. थोड्याच वेळात या महिलेची बसमध्येच प्रसूती (woman gave baby birth in running ST bus ) झाली. तिने गोंडस मुलाला जन्म दिला. बसमधील महिलांनी सुरक्षेसाठी या महिलेच्या भोवती कोंडाळे केले होते. याच मार्गावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबवण्यात आले. सदर महिला आणि तिच्या बाळाला या रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे हलविले. या महिलेसह तिच्या बाळाची प्रकृती ठीक असल्याचे मिशन माय म्हारळचे निकेत व्यवहारे यांनी सांगितले.
रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष : कल्याण-अहमदनगर व्हाया मुरबाड-माळशेज या NH 61-222 महामार्गावरील म्हारळगावाजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून थारवाणी बिल्डिंग ते ताबोर आश्रम (कांबा-पावशेपाडा) पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्गावरील या पट्ट्यात दररोज लहान-मोठे अपघात होत असतात. वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या भागातील जागरूक व त्रस्त रहिवाश्यांनी आंदोलने छेडली आहेत. मात्र तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या महामार्गावर नेहमी लहान-मोठे अपघात होत असतात. याच मार्गावरून जाणाऱ्या एसटीतील एका गर्भवती प्रवासी महिलेवर भयंकर गुजरला.