ठाणे : Woman Delivery In Bag : शहापूर तालुक्यातील वशाळा ग्रामपंचायत हद्दीतील पटिकाचा पाडा येथील एका गर्भवती महिलेस १ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास प्रसूती वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्याने कसारा येथील असलेल्या आरोग्य केंद्रात नातेवाईकांसह गावकरी निघाले तिला घेऊन निघाले होते; मात्र रस्त्याअभावी झोळीत टाकून जंगलातून तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत तिला आरोग्य केंद्रात नेले जात होते. वाटेतच आज दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास झोळीमध्ये तिची प्रसुती झाली. यावेळी गावातील एक आशावर्कर सोबतच असल्याने प्रसुती सुखरूप होऊन महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर मुख्य रस्त्यापर्यंत झोळीतूनच प्रवास केल्यानंतर सरकारी रुग्णवाहिकेला संपर्क केला गेला. मात्र, रुग्णवाहिका न आल्याने माता आणि नवजात बाळाला एका खासगी वाहनाने कसारा आरोग्य केंद्रापर्यंत पोचविण्यात आले. हे शासकीय यंत्रणेचे अपयश आणि दुर्दैव म्हणावं लागेल.
साडेचार किमीचा झोळीतून प्रवास: त्या गरोदर महिलेला आरोग्य सेवा मिळविण्यासाठी साडेचार किलोमीटर चादरीच्या झोळीतून पायपीट करत जंगल तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत आरोग्य केंद्र गाठायचे होते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही मुखमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अनेक गावपाड्यात आजही रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोली करून पायपीट करत दवाखान्यात जावे लागते. तर वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने कधीकधी प्राणसुद्धा गमवावे लागतात. राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी मिळूनसुद्धा आजही हा भाग विकासापासून कोसो दूर आहे. राज्य शासनासह लोकप्रतिनिधींनी या मूलभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्याच्या कामाची दखल नाहीच: विशेष म्हणजे, शहापूर तालुक्यातील पटिकाचा पाडा या गावात रस्त्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून गावकरी वारंवार शासकीय अधिकाऱ्यांकडे मागणी करीत होते. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता उभारण्याचे ठरले. त्यावेळी पालकमंत्री असलेले सध्याचे मुख्यमंत्री यांनी हे गाव दत्तक घेतले होते. त्यामुळे २०१८ साली या रस्त्याला लाखोंचा निधी मंजूर करून ठेकेदाराला कामाचे कंत्राट दिले गेले; मात्र अद्यापही स्थानिक शासकीय यंत्रणेने या रस्त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शिवाय रुग्णसेवा मिळावी म्हणून या भागातील गावपाड्यासाठी आरोग्य पथक अथवा रेस्क्यू कॅम्प स्थापन करण्यात यावा, अशी मागणी गावातील जागृत नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा:
- Nanded Road Issues : मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात इथे यातना; रस्ता नसल्याने गांवकऱ्यांचे हाल, जगदंबा तांड्यावर झोळीतून आणला मृतदेह
- Palghar Flood : गरोदर महिलेचा रस्त्याअभावी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास; पालघरमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ
- Raireshwar Plateau : बाळंतीण महिलेला घरी जाण्यासाठी करावी लागते कसरत, पहा थरारक व्हिडिओ