ठाणे : आगामी ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने जोरदार प्रयत्न केले असून ठाण्यात पुन्हा एकहाती सत्ता मिळवण्यासाठी नवीन राजकीय खेळी खेळण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. एकीकडे मोठे आव्हान असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गळाला लागले जाणार आहेत.
ठाण्यात राजकीय भूकंप? : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटात इनकमिंग जोर धरू लागला असताना ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे गटाच्या टार्गेटवर असल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडण्याच्या तयारीत शिंदे गट असून येणाऱ्या काळात मोठे भूकंप पाहायला मिळणारं आहेत.
शिंदे गटाची मोठी खेळी : ठाणे मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत असून त्याप्रकारे रणरीती देखील आखण्यात आली आहे. तर, राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी असल्याचे देखील बोलले जात आहे.
इथून झाली चर्चेला सुरवात : नुकतेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिसानिमित्त मुंब्र्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांसह, खासदार इतर नेत्याचे फोटो झळकले होते. यावरून जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामूळे एकीकडे हेच नगरसेवक आमदार जितेंद्र आव्हाडांवर नाराज असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात या राजकीय भूकंपात कोणाचा बळी जाणार हा येणारा काळच ठरवेल.
हेही वाचा - Somayya Accuses BMC : कोविड घोटाळ्यात मुंबई महापालिकेची चौकशी करा, किरीट सोमय्या यांची मागणी