ठाणे - पती पसंत नसल्याच्या कारणावरून नवविवाहित २२ वर्षीय पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने पतीला जेवणात विष देवून बेशुद्ध अवस्थेत वायरने गळा दाबून हत्या केली. ही घटना कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरातील दुर्गामाता मंदीराजवळील घडली.
खळबळजनक बाब म्हणजे घरात चोर शिरले होते. त्या चोरांचा प्रतिकार करत असताना माझ्या पतीची त्यांनी हत्या केल्याचा बनाव आरोपी पत्नीने केला होता. याचा पोलीस तपासात खुलासा झाल्याने कोळसेवाडी पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. वृषाली साळुंखे असे पतीच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. जगदीश साळुंखे (वय २५) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरात दुर्गामाता मंदिराजवळ मृत जगदिश साळुंखे हा पत्नी वृषाली सोबत राहत होता. तो फार्मा कंपनीत कामाला होता. या दोघांचे ६ महिन्यांपूर्वी लग्न ठरवून २९ डिसेंबरला म्हणजे ३ महिन्यांपूर्वी त्यांचा जळगावात विवाह झाला होता. मात्र, लग्न जुळण्याच्या आधीच वृषालीला पती जगदीश आवडत नव्हता. त्यामुळे दोघांचे सतत काहीना काही कारणाने वाद होत होते. ६ मार्चला दोघांमध्ये वाद झाला. त्या वादातून तिने पतीला जेवणातून विष देत बेशुद्ध केले आणि वायरने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वृषालीने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून घरात चोर आल्याचे सांगत त्यांनी पती जगदिशची हत्या केल्याचा कांगावा केला. त्यानंतर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत जगदीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पुढील तपास सुरू केला. काही दिवसांनी आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात जगदिशला विषारी पदार्थ खायला देऊन गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी पोलिसांना हत्या झाल्याचा कांगावा करणाऱ्या पत्नी वृषालीवर संशय आला. त्यांनी वृषालीला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच तिने केलेल्या कृत्याची कबुली दिल्याची माहिती साहाय्यक पोलीस अनिल पोवार यांनी दिली. याप्रकरणी आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलिसांनी सुरू आहे. पतीच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या पत्नी वृषालीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.