ठाणे : माहेरहून हुंड्याच्या स्वरूपात पैसे आणण्यासह पती अनैसर्गिकपणे लैंगिक संबंध करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसंच पती व सासूच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडित पत्नीने पती व सासूच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीवरुन ३५ वर्षाचा पती तसंच ६० वर्षाच्या सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
पत्नीशी अनैसर्गिकपणे लैंगिक संबंध : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील कामतघर परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय पीडित महिलेचा नाशिक येथे राहणाऱ्या आरोपी पतीशी १५ जून २०२० रोजी विवाह झाला आहे. त्यातच पीडित पत्नी ही सासू व पतीसह नाशिकमध्ये ५ जून २०२३ पर्यंत राहत होती. दरम्यान या कालावधीत पती व सासूनं आपसात संगनमतानं पीडित विवाहितेकडं हुंड्याच्या स्वरूपात माहेरहून पैसे आणावेत याकरता सतत तगादा लावला होता. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी पती हा पत्नीशी अनैसर्गिकपणे लैंगिक संबंध करत असल्याचंही पीडीतीनं तक्रारीत नमूद केलं आहे. पतीच्या अनैसर्गिक लैंगिक कृत्याला विरोध केला असता, आरोपी पतीने पीडित पत्नीला बेदम मारहाण केल्याचंही तक्रारीत नमूद केलं आहे.
पती आणि सासूच्या विरोधात तक्रार : पतीच्या या अनैसर्गिक कृत्याला तसंच सासूच्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेनं २७ ऑगस्ट रोजी नारपोली पोलीस ठाणे गाठून पती आणि सासूच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगानं पोलिसांनी पती व सासू विरोधात भादंविच्या ४९८(अ) सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे करत आहेत.
कौटुंबिक हिंसाचारच्या घटनेत वाढ : दुसरीकडे जिल्ह्यात हुंड्याच्या त्रासाला कंटाळून अनेक विवाहितांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. हुंड्यासाठी पतीनं पत्नीवर अनैसर्गिकपणे लैंगिक अत्याचार केल्याची भिवंडी शहरातील बहुदा पहिलीच घटना उघडकीस आली आहे. त्यामुळं कौटुंबिक हिंसाचार कुठल्या थराला जाऊ शकतो हे या घटनेवरून दिसून आलं आहे.
हेही वाचा...