ठाणे - कल्याण, डोंबिवलीसह भिवंडीत पावसाने मध्यरात्रीपासून धुमाकूळ घातला आहे. या तिन्ही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. अनेक दुकाने आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बहुतांश घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे, तर नाले सफाई न झाल्याने त्यातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे. शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी, ईदगहा रोड येथील कामवारी नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांनी दुसरीकडे स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूर फाटा- रांजनोली बायपास नाका, वंजारपट्टी नाका, नारपोली अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
कल्याण-डोंबिवलीत सखल भाग जलमय; केडीएमसीची धावाधाव -
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी झाडे व एक इलेक्ट्रिक पोल कोलमडून पडले. अग्निशामक व उद्यान विभागामार्फत सदर झाडे व पोल उचलण्यात आली. महापालिकाक्षेत्रातील अटाळी, चिकणघर व बेतुरकरपाडा या परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर सदर तक्रारींवर प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी कामगारांमार्फत साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू करण्यात आले.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वारणा, कामवारी, तानसा या नद्यांच्याकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सायंकाळपर्यंत असाच मुसळधार पाऊस सुरू राहिला तर या नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर कामवारी नदीलगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील सखल भागात असलेल्या घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.