नवी मुंबई - राज्यभरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती व भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईतील किरकोळ भाजी बाजारावर होत आहे. भाजीपाल्याची आवक कमी आहे. भाज्यांना अधिक मागणी असतानाच पुरवठा कमी झाल्याने भाज्यांचे दर घाऊक बाजारात १० ते १५ व किरकोळ बाजारात ४० ते ८० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
वाशी व पनवेल येथील बाजार समितीच्या भाजी बाजारात दररोज होणारी आवक निम्म्यापेक्षाही अधिक संख्येने मंदावली. काढणीला आलेली पिके पावसामुळे वाया गेली असल्याने भाजीपाल्याची आवक थांबली. नाशिक, पुणे या जिल्ह्यातून येणारा कांदा, टोमॅटोसह फ्लॉवर, गवार, वांगी, सिमला मिरची, पालेभाज्यांचे भाव वाढले असल्याने दुप्पट दराने भाज्या ग्राहकांना विकत घ्याव्या लागत आहेत.
नाशिक व पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे या भागातून होत असलेला पुरवठा कमी झाला आहे. यासह इतर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असल्याने तिथूनही भाज्या कमी प्रमाणात येत आहेत. त्यामुळे आवक घटल्याने घाऊक व किरकोळ बाजारात भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात १० ते २५ तर किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पालेभाज्यांनी तीशी व साठी गाठली आहे, तर रोजच्या वापरात असणारी कोथिंबीर महागल्याने ग्राहकांपुढे पेच उभा राहिला आहे. १० ते २० रुपयांना मिळणारी कोथिंबीरीची जुडी ६० ते १२० रुपयांना मिळत आहे. याचा परिणाम गृहिणींच्या थेट बजेटवर झाला आहे.
भाज्यांचे दर किरकोळ बाजारात (प्रतिकिलो रुपयांत)
लसूण | १६० ते २४० |
कांदा | ५० ते ६० |
आले | १०० ते १२० |
वांगी | ८० ते १०० |
भेंडी | ८०ते ९० |
टोमॅटो | ५० ते ६० |
सिमला मिरची | ६० |
काकडी | ५० |
गवार | ८० |
वालाच्या शेंगा | १०० |
पावटा | ८० |
दोडका | ६० |
मटार | १४० |
फ्लॉवर | ६० ते ८० |
शेवग्याच्या शेंगा | २०० |
पालेभाज्यांचे दर (जुडी, रूपयांत)
कोथिंबीर लहान जुडी | ६० |
कोथिंबीर मोठी जुडी | १२० |
मेथी छोटी जुडी | ३५ |
मेथी मोठी जुडी | ६० |
पालक जुडी | ३० |
शेपू जुडी | ३५ |