नवी मुंबई - आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने महिला प्रवाशास लुटणाऱ्या दोन तृतीयपंथींना गजाआड करण्यास वाशी पोलिसांना यश आले आहे. रफिका अल्लाबक्ष खान (२२) व मिनाक्षी मासागर (३०) अशी या तृतीयपंथींची नावे आहेत.
आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने केली लूटमार -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी गुरुवारी दुपारी वाशी सेक्टर-१७ येथील पामबीच मार्गावर असलेल्या सिटी बैंक सिग्नलवर भिक मागत उभे होते. भर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाशीत राहणारा मयुर साळुंखे हा तरुण आपल्या फॉर्च्युनर कारमधून नेरुळ येथे जात होता. यावेळी रफिका अल्लाबक्ष याने आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने मयुरची कार सिटी बँकेच्या सिग्नलवर थांबवली. यावेळी वैशाली यांनी रफिका याला पैसे देण्यासाठी आपली पर्स बाहेर काढली असता रफिका याने वैशाली यांच्या जवळची ४२ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पर्स घेऊन पलायन केले होते.
वाशी पोलिसांनी केली कारवाई -
या घटनेनंतर मयुर साळुंखे याने सदर तृतीयपंथीचा आसपास शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न सापडल्याने त्याने वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दोघे तृतीयपंथी टॅक्सीने वाशीत आल्याचे आढळून आले.
त्यानुसार पोलिसांनी टॅक्सीचा शोध घेतला असता दोघे तृतीयपंथी सायन कोळीवाडा येथे रहाण्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोघा तृतीयपंथीना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनीच सदरची लूट केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन तृतीयपंथींना अटक करुन त्यांच्याकडून काही रोख रक्कम जप्त केली आहे.