ठाणे - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीए)च्या वतीने घेण्यात आलेल्या 'सीए'च्या परीक्षेत डोंबिवलीकर वैभव हरिहरनने देशामध्ये दुसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती.
डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात वैभव हरिहरनचे कुटुंब राहते. वैभव लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होता. शाळेमध्ये असताना वैभव सीबीएसई बोर्डामध्ये पहिला आला होता. तर बारावीला देखील तो चांगल्या गुणांनी उतीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने सीए होण्याचे निश्चित केले. व त्यादृष्टीने अभ्यास सुरू केला. दरम्यान आज वैभवचे सीए होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. त्याने सीएच्या परीक्षेत देशात दुसरा येण्याचा मान पटकवला आहे. यावर प्रतिक्रिया देताना वैभव याने म्हटले आहे की, सीएच्या परीक्षेत चांगले मार्ग मिळतील याची खात्री होती. मात्र देशात दुसरा येईल असे कधी वाटले नव्हते. सुरुवातीला आपण 10 ते 12 तास अभ्यास करत होतो. तर परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासाचे तास वाढवत 14 ते 18 तास अभ्यास केल्याचे वैभवने सांगितले.
वैभववर कौतुकाचा वर्षाव
वैभवचे वडील निवृत्त बँक कर्मचारी असून, आई खासगी शाळेमध्ये शिक्षिका आहे. वैभवच्या या यशाने त्याचे आई-वडीलही भारावून गेले आहेत. सर्व स्तरातून वैभवर कैतुकाचा वर्षाव होतो आहे. दरम्यान 2017 साली डोंबिवलीच्याच राज शेठ या तरुणाने सीए परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवला होता.