ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच मुसळधार पावसाने दोन बळी गेल्याची घटना समोर आली आहे. पहिल्या घटनेत रेल्वे रुळालगत चालत असलेल्या एका व्यक्तीच्या हातातून चार महिन्याचे बाळ वाहत्या नाल्यात पडून वाहून गेले. ही घटना कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान पत्रीपूलजवळील रेल्वे रुळालगत असलेल्या नाल्यात घडली आहे. गेल्या चार तासापासून बाळाचा शोध सुरू असून अद्यापही बाळ बेपत्ताच आहे. तर, दुसरीकडे घटना घडल्यापासून बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. ऋषिता असे वाहून गेलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर दुसरी घटना भिवंडी शहरात घडली असून नाल्याला पूर आल्याने त्या पुराच्या पाण्यात १४ वर्षीय मुलगी वाहून गेली आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुरात बाळ गेले वाहून : याबाबत मिळालेली माहिती अशी की, मूळ हैदराबाद येथील सासरी असलेली योगिता रुमाल (वय ३०) ही महिला आपल्या माहेरी भिवंडी येथील धामणकर नाका परिसरात आपल्या वडिलांकडे आली आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यांपासून नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेली मुलगी ऋषिता रुमाल या बाळावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज देखील योगिता ही आपल्या मुलीला घेऊन वडीलासंह रुग्णालयात मुंबईला गेली होती. त्यामध्ये मुंबईवरून येणारी अंबरनाथ लोकल पावसामुळे उशिरा धावत होती.ही लोकल आज दुपारच्या सुमारास ठाकुर्ली, कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान सुमारे २ तास उभी होती. त्यामुळे त्यामधील काही प्रवाशी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. या प्रवाशांमध्ये चार महिन्याचे बाळ घेऊन एक व्यक्ती, त्या बाळाची आई रेल्वे रुळावरून कल्याणच्या दिशेने चालत येत असताना ही घटना घडली आहे. रेल्वेरुळाखालून मोठा नाला वाहत आहे. याच नाल्याच्या पाईपवरून ती व्यक्ती बाळ घेऊन जात होती. त्यावेळी अचानक त्या व्यक्तीच्या हातून चार महिनाचा बाळ सटकून पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. विशेष म्हणजे ज्या नाल्यात बाळ पडले तो नाला कल्याण खाडीला जात आहे. खाडी २०० ते ३०० फुटाच्या अंतरांवर असल्याने वाहून गेलेले बाळ अद्यापही बेपत्ता आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपारी २:५५ वाजता घडली आहे.
बाळाच्या शोध मोहिमेत अळथळे : या घटनेनंतर स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांनी शोधकार्य सुरू केले आहे. शिवाय सायंकाळी एनडीआरएफचे पथकही शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी निघाल्याची माहिती जिल्हा प्रशाससानाकडून देण्यात आली आहे. मात्र घटनास्थळी अंधार पडला असून बाळाच्या शोध मोहिमेत अळथळा येत असल्याचे अग्निशमन जवानांनाकडून सांगण्यात आले आहे.
१४ वर्षीय मुलगी गेली वाहून : मुसळधार पावसाने भिवंडी शहर संपूर्ण जलमय झाले आहे. त्यातच निजामपूर शहर महानगपालिका हद्दीतील टेमघर स्मशान भूमी येथील नाल्यामध्ये आज दुपारच्या सुमारास सुजाता बबन कदम ही १४ वर्षीय मुलगी नाल्याच्या पाण्यात वाहून गेली होती. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहून गेलेल्या मुलीचा शोध सुरू केला असता, १ तासानंतर तिचा मृतदेह जवानांच्या हाती लागला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.