ठाणे - कामगार नगरी तसेच दाटीवाटीचे शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात आज नव्याने दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. यापैकी एक रुग्ण मुबंईतील वांद्रे तर दुसरा रुग्ण मालेगाववरून भिवंडीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे भिवंडी शहरात ११ एप्रिलपर्यत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, १२ एप्रिला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समोर आले होते. हा पहिला रुग्ण मुंब्रा येथे एका मशिदीत जमातच्या कार्यक्रमात गेला होता. तो भिवंडीत परत आला असता सुदैवाने या रुग्णाला कोरोनाची लागण होण्यापूर्वीच भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले होते. आज मात्र पुन्हा नव्याने दोन रुग्ण आढळून आले असून यापैकी ५३ वर्षीय व्यक्ती मालेगावरून आला होता, तर २३ वर्षीय तरुण मुंबईतील बांद्रा येथून आल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाचे कुठलेही लक्षणे दिसून आली नाही. आता दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते राहत असलेल्या परिसरात पालिका प्रशासनाने सील करून याठिकाणी नागरिकांचे सर्व्हेक्षण केले आहेत, तर दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांसह ते ज्यांच्याशी संर्पकात आले अशा नागरिकांना क्वारंटाईन केंद्रात घेऊन जाण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भिवंडी शहर व ग्रामीण भागात आतापर्यत कोरोना बाधितांची संख्या ४ झाल्याने शहरासह ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.