ठाणे - पानटपरीतून पान-विडी नव्हे, तर तळीरामांना चक्क विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर २ परिसरातील बालाजी मार्केट जवळ असलेल्या पानटपरी समोर घडली आहे.
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोघा हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद श्यामलाल कुकरेजा (व ५१ वर्षे) व अमित राजा मीरचंदानी, असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर सचिन संतोष चव्हाण (वय ३० वर्षे, रा. कोनगाव), असे गंभीर जखमी झालेल्या राज्य उत्पादक विभागातील पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी विनोद कुकरेजा याच्या मालकीची पानटपरी उल्हासनगर कॅम्प नंबर २ येथील बालाजी मार्केट नजीक आहे. लॉकडाऊनमध्ये देशी–विदेशी दारूची दुकाने बंद असल्याने तळीरामही दारू मिळविण्यासाठी धडपड कररत पाहिजे ती किंमत देऊन दारू विकत घेत होते. याचाच फायदा घेऊन पानटपरी मालक विनोद हा त्याच्या पानटपरीतून अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती उल्हासनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस कमर्चारी सचिन संतोष चव्हाण हे मंगळवारी (११ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास पानटपरीवर तपासासाठी गेले होते. याठिकाणी आरोपी विनोद कुकरेजा आणि त्याचा मित्र अमित राजा मीरचंदानी यांनी अचानक पोलीस कर्मचारी चव्हाण यांना शिवीगाळ करत मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला. हे दोघेही हल्लेखोर एवढ्याच थांबले नाही. तर मुख्य आरोपी विनोद कुकरेजा याने लोखंडी रॉडने चव्हाण यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. शिवाय या आरोपींनी चव्हाण यांचा मोबाईल देखील फोडला.
दरम्यान, लोखंडी रॉडच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या चव्हाण यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी चव्हाण यांच्या तक्रारीवरून हल्लेखोर विनोद कुकरेजा आणि अमित मीरचंदानी यांच्याविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात विविध कलामानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुवर करीत आहेत.