नवी मुंबई - मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर एक भीषण अपघात झाला. एका स्विफ्ट कारला कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातातील लोकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या मर्सिडीज कारला देखील टेम्पोने धडक दिली. या धडकेत मर्सिडीजमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दोन मदतकर्त्यांचा दुर्दैवी मृत्यू -
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारला कंटेनरने मागून धडक दिली होती. त्याच दरम्यान तेथे पनवेल रूग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते (वय 26) आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे व इतर दोनजण मदत करण्यासाठी आपली मर्सिडीज गाडी घेऊन थांबले. त्यावेळी अचानक मागून आलेल्या आयशर टेम्पोने मर्सिडीजला धडक दिली. या धडकेत सुशांत मोहिते (वय 26) आणि मोहितेंचे सहकारी प्रथमेश बहिरा (वय 24) यांचा मृत्यू झाला. या अपघातात हर्षद खुदकर हे जखमी झाले असून त्यांना एमजीएम रूग्णालयामध्ये दाखल केले आहे. तर, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे हे सुखरूप आहेत.
या मल्टी व्हेईकल अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक रूग्णालयामध्ये दाखल केले आहे. पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा अपघात घडला आहे. यावेळी आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस यांनी मदत केली.