ठाणे - शहरासह जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे ठाण्यातील रस्ते जलमय झाले आहेत. स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या ठाण्यात उघड्या गटारींचे प्रमाण जास्त आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहताना तेथे रस्ता आहे की गटार याचा अंदाज लावत ठाणेकर चालत असतात. उघड्या गटारीत महिला पडल्याची घटना बुधवारी दिव्याच्या आगासन रोड येथे घडली आहे. तर आज (गुरूवारी) ठाण्यातील जांभळीनाका परिसरात एक वृद्ध उघड्या गटारीत पडल्याची घटना घडली आहे.
दोन दिवसात दोन घटना घडल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या ठाणेकरांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. उघड्या गटारीजवळ कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाही. उघड्या गटारीत पडून लहान मुले वाहून गेल्याच्या घटना ताज्या असतानाही प्रशासन उघड्या गटारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ठाणे महापालिका अधिकारी, ठेकेदार तसेच लोकप्रतिनिधी मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
ठाण्यात प्रत्येक पावसाळ्यात कोट्यवधींचा निधी खर्च करूनही नाले गटारे ही साफसफाई होत नाहीत. साफसफाईसाठी उघडी केलेली गटारेही पुन्हा लवकर बंदिस्त करण्यात येत नाहीत. यामुळेच अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. ठेकेदार गटारे उघडी करतात ती साफ झालेली आहे कि नाही याचा जातीने लेखाजोखा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी घेत नाहीत. यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचेही नागरिक म्हणत आहेत.