ठाणे - अमेरिकन डॉलर स्वस्तात एक्सचेंज करण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीला २ लाखांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीने पीडित व्यक्तीकडून भारतीय चलनातील दोन लाखाच्या नोटा घेऊन त्याबदल्यात नोटांच्या आकाराचे वर्तमान पत्राचे बंडल अमेरिकन डॉलर म्हणून देऊन हा घातला. या प्रकरणी शीळडायघर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. श्रीनाथ अयोध्या सोमनाथ असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीत एक टोळीच सक्रीय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता दोघांआरोपी विरोधात शीळडायघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.
केअर टेकर मावशी असल्याची थाप-
या प्रकरणातील तक्रारदार श्रीनाथ अयोध्या सोमनाथ वाशी नवीमुंबई हा ओला कार चालक आहेत. त्यांच्या गाडीत बसलेले प्रवासी यांनी चालक सोमनाथ याला बोलता बोलता थाप मारली की. त्यांची मावशी केअरटेकर म्हणून एका महिलेकडे काम करत होती. आता ती महिला मृत पावली आहे. तिच्या निधनानंतर तिचे सर्व सामान मावशीला मिळाले आहे. मृत महिलेच्या गाडीमध्ये अमेरिकन डॉलर सापडले आहेत, ते एक्सचेंज करायचे आहेत. जर कुणी असल्यास त्याची माहिती सांगा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार ओला कार चालक सोमनाथ हे ४ सप्टेंबर,२०२० रोजी स्वतः कल्याणफाटा परिसरात २ लाख रुपयांच्या भारतीय चलनाच्या नोटा घेऊन आले. त्यावेळी आरोपीने आपला मित्र २० ते २५ वर्षीय तरुणाला आणि एका अनोळखी महिला ४० ते ४५ वर्षीय यांना पाठवून तक्राराराच्या हातात वर्तमान पात्राच्या कागदाचे नोटांच्या आकाराचे बंडल दिले आणि त्यांच्याकडे असलेले २ लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला.
खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून शोध-
सदर प्रकरणी शीळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपस सपोनि प्रदीप सरफरे यांना खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली. शीळफाटा दोन व्यक्ती हे अमेरिकन डॉलर कब्जात बाळगून एक्सचेंज करण्याकरीता विचारणा करीत संशयास्पद फिरत होते. माहिती नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रदीप सरफरे, सपोनि भषण कापडणीस व पोलीस स्टाफ यांची पथक तयार करून केलेल्या योजनाबध्द छापा मारून आरोपी सफिउला ऐनूल शेख (२५) याकूब अलिहुसेन शेख (२२) दोन्ही आरोपी राहणार मिलेनियम चाळ, एस.के.बिल्डींग बाजूला, कौसा,( मुंब्रा मुळ रा.गाव पस्मपुर, पो.पिअरपूर, ता.साहेबगंज, राजमाल, झारखंड) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून २० डॉलर्स चलनाच्या ५ नोटा व १ डॉलरची एक नोट, एक भगवा रंगाची पिशवी त्यामध्ये वर्तमानपत्राचे बंडल, ३ मोबाईल, रोख रु. १५००/- असा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्या अधिक चौकशीत आरोपींची २३ हजार ५०० रुपयांची रिकव्हरी दिली असून त्यांचे अन्य साथीदारही आहेत. ते सर्व झारखंड आणि पश्चिम बंगालचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारच्या गुन्ह्यात किमान ६ ते ७ आरोपी समाविष्ट असल्याचा संशय पोलिसांना आहे.
आरोपींची कार्यपद्धती -
फसवणुकीच्या प्रत्येक कामासाठी ही टोळी स्वतंत्र मोबाईलचा वापर करते. तसेच त्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या असून अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे संपुर्ण महाराष्ट्रात करीत असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरात अनेक गुन्हे केल्याची कबूली दिली आहे.