ठाणे : हत्या करून मृतदेहांना मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात आणून फेकले जात असल्याच्या घटना घडतच आहे. यामुळे कसारा घाट मृतदेहांना फेकण्याचे ठिकाण बनले की काय? असा प्रश्न चर्चेला जात असतानाच पुन्हा दोन व्यक्तीची हत्या करून, मृतदेह कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आले. दोन्ही व्यक्तीची दुसरीकडे हत्या करून त्यांचे मृतदेह घाटात फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
मृतदेह आढळून आला : शहापूर तालुक्यातील कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीचे मृतदेह मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात फेकल्याची माहिती, कसारा पोलिसांना १९ जून रोजी दुपारच्या सुमारास मिळाली होती. कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पहिला मृतदेह मुंबई नाशिक महामार्गावर वाशाळा फाटा या ठिकाणी आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत असतानाच, दुसरा मृतदेह नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंट जवळ मार्गालगतच्या खड्यात, झाडाझुडपात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांना दुसरा मृतदेह आढळून आला.
दोन्ही व्यक्तींची हत्या : दरम्यान, दोन्ही ठिकाणी पोलिसांनी पंचनामे केले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवले. त्यानंतर दोन्ही घटनेतील अज्ञात आरोपीविरोधात हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केला आहे. दोन्ही व्यक्तींची हत्या करून त्यांचे मृतदेह हे कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कसारा घाट व वाशाळा फाटा या ठिकाणी फेकण्यात आले. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी अधिक तपास कसारा पोलीस करत आहे. तर मृतदेह ज्या दोन्ही ठिकाणी आढळून आले होते. त्या घटनास्थळी ठाणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी भेट दिली. मात्र ४८ तास उलटून गेले तरी अद्यापही हे दोन्ही मृतदेह कोणाचे याबाबत तपास सुरु आहे.
पत्नीच्या प्रियकराने खून करुन फेकला मृतदेह : यापूर्वीही १६ एप्रिल २०२३ रोजी नवीन कसारा घाटात खोल दरीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात, कसारा व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले होते. अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रियकराने त्याच्या एका मित्राच्या मदतीने डोंबिवलीत हत्या करून, पतीचा मृतदेह टेम्पोत आणून कसारा घाटातील खोलदरीत फेकला. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला दगडाने ठेचण्यात येऊन खोल दरीत फेकण्यात आला होता. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा अज्ञात आरोपी विरोधात दाखल केल्यानंतर ४८ तासातच हत्येचा उलगडा झाला होता. या हत्येप्रकरणी पत्नीचा प्रियकर मनुकुमार त्रिलोकनाथ खरवार (वय २८) आणि मृतकची पत्नी कोमल कोथेरे (वय २३) या दोघांना अटक केली होती. तर सुशील कोथेरे असे हत्या झालेल्या पतीचे नाव होते.
हेही वाचा -