ठाणे - रविवार सुट्टीचा दिवस मजेत घालण्यासाठी मित्रांसोबत अंबरनाथ नजीकच्या धरणात (Children drowned in Ambernath dam) गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. हे दोघेही अंघोळीसाठी धरणात उरले असतानाच खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही धरणाच्या पात्रात बुडून बेपत्ता झाले आहे. सार्थक (वय 15,) महादेव (वय- 16,) अशी धरणात बुडून बेपत्ता झालेल्या अल्पवीयन मुलांची नावे आहेत.
अंधार पडल्याने मदतकार्य थांबविले
मृतक दोघेही अंबरनाथ महालक्ष्मी टेकडी भागात राहत असून आज (रविवारी) दुपारच्या सुमाराला अंबरनाथ नजीक चिखलोली धरणावर अंघोळीसाठी मित्रांसोबत गेले होते. मात्र धरणातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले. तर या घटनेची माहिती अंबरनाथ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचा धरणाच्या पाण्यात शोध सुरु केला. मात्र अंधार पडल्याने मदतकार्य थांबविण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली असून उद्या पुन्हा मदतकार्य सुरु करून दोघांच्या मृतदेहाचा शोध घेणार असल्याचेही सांगितले. तर मुलं राहत असलेल्या अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मी टेकडी भागात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - धक्कादायक - पत्नी काही दिवसापासून बोलत नसल्याचा राग मनात धरून पतीने केली हत्या