ठाणे - डोंबिवलीमध्ये चक्क ८०० ते हजार रुपयामध्ये माशांच्या जेवणाचे आमिष दाखवत दोघा भामट्यांनी शेकडो नागरिकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्यांनी त्या भामट्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी दोघा भामट्यांना गजाआड केले. मितेश गुप्ता, अरुण शिंदे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पैशांच्या हव्यासापोटी भामटे कसा व कधी कोणती शक्कल लढवत गंडा घालतील याचा काही नेम नाही. मुलुंड येथे राहणार मितेश गुप्ता व डोंबिवलित राहणारा अरुण शिंदे या दोघा भामट्यांनी पैसे कमविण्यासाठी अजब शक्कल लढवली. त्यांनी ऑललाईन जाहिरात करून प्रति कपल ८०० ते हजार रूपये भरल्यास अनलिमिटेड सुरमई, प्रॉन्ज, पापलेट, बांगडा आदी माशांचे जेवण मिळेल, अशी जाहिरात केली होती. ही मेजवानी डोंबिवली पूर्वेकडील गोळवली, दावडी रोड पाटीदार हॉलनजीक असलेल्या मैदनात २४, २५, २६ मे रोजी सायंकाळी ठेवण्यात आल्याची जाहिरात करण्यात आली होती.
८०० ते हजार रुपयात दोन जणांना माशांचे भरपेट जेवण मिळेल, या आशेने शेकडो खवय्यांनी दोघा भामट्याकडे जेवणाचे पैशे अगाऊ भरले होते. ठरल्याप्रमाणे २४ तारखेला त्या ठिकाणी खवय्ये हजर झाले. मात्र त्या ठिकाणी मंडप उभारून खुर्च्या टेबल लावण्यात आले. विशेष म्हणजे कांदा, लसून, कोथिंबीर, अद्रक, मिरच्या तसेच भाकरी आणि भांडीकुंडीही ठेवल्याचे आढळून आले. मात्र जेवणाची वेळ निघून जात असताना सुरमई, प्रॉन्ज, पापलेट, बांगडा आदी माशांच्या कालवणाचा पत्ताच नव्हता. त्यानंतर जेवणाची वेळ निघून जात असल्याने आपली पोटभर मांशांचे जेवण देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे शेकडो खवय्यांना लक्षात आले. त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांच्यावर घडलेला प्रसंग सांगत मानपाडा पोलिसांत आयोजकांविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी मितेश गुप्ता, अरुण शिंदे या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.