विरार (ठाणे) - निर्सगाचे देणे लाभलेल्या वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर अभयारण्याला मागील दोन दिवसांपासून वणवे लागले आहेत. या अभयारण्यात अनेक प्रजातींच्या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा अधिवास आहे. मात्र, सतत लावल्या जाणाऱ्या आगीमुळे येथील वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
निसर्ग व प्राणी पक्षी यांच्या अधीवासाला धोका -
वसई पूर्वेला तुंगारेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्याचे ८ हजार ५७० हेक्टर वनक्षेत्र आहे. धबधबे पाणवठा, वृक्ष, पक्षी आणि प्राण्यांचा येथे मोठया प्रमाणावर अधिवास आहे. मात्र, येथे अधून मधून आगी लागण्याच्या घटनेमुळे निसर्ग व प्राणी पक्षी यांच्या अधीवासाला धोका पोहचत आहेत. गेल्या दोन दिवसापासून अभयारण्याच्या पूर्वेकडील माजिवली, देपीवली, मस्किना बाजूने तर पश्चिमेकडे व उत्तरेकडेही अनेक छोटे मोठे वणवे लागले आहेत. या अभयारण्यात नेहमी वणवे लागतात. मात्र, नेमकी आग कुठे लागली आहे, याचा शोध घेत वन विभाग त्याठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करते. मात्र, तोवर आग वाऱ्यासारखी पसरत जाते आणि ती आटोक्यात आणण्यासाठी वेळ जातो.
रानमेव्यावरील रोजगार बुडण्याची भीती -
अभयारण्याचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. सध्या लागत असलेल्या अथवा लावल्या जाणाऱ्या या वणव्यांमुळे अभयारण्यातील प्राण्यांसह वनसंपदेला मोठी हानी पोहचत असून फुलोऱ्यावर आलेल्या काळ्या मैनेला, दाट मोहोर धरलेल्या रायवळी आंब्यांना, हाटूरणे, शिवण, तोरण, आदी सारख्या रानमेव्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जंगली रानमेव्यावर रोजगार मिळवणाऱ्या रहिवाश्यांचा रोजगार बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
तुंगारेश्वर अभयारण्याला लागलेल्या वणव्याला विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू असून यासाठी पाच पथके तयार केली आहेत. मात्र, अत्यंत उताराचा असा हा परिसर आहे,यामुळे वणवा शांत व्हायला उशीर होत आहे. तरीही शक्य नसलेल्या अशा अवघड ठिकाणी चढून गवत हटवून वणव्याची सीमा रेषा करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे, असे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार म्हणाले.