ठाणे- भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला टेम्पोच्या चाकाखाली येऊन जागीच मृत झाली आहे. भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत क्षेत्रातील सावरापाडा येथे ही घटना घडली. ललिता चंद्रशेखर महंतो (वय, 40 रा. मिठपाडा, भिवंडी ) असे मृत महिलेचे नाव आहे.
हेही वाचा- हे राम..! नाशिक मनपाच्या शाळेत आसाराम बापुंच्या विचारांचे धडे
ललिता महंतो या भिवंडी शहरातील मिठपाडा परिसरात कुटुंबासह राहत होत्या. आज दुपारी ललिता या पती सोबत दुचाकीवरून खाडीपार येथे जात होत्या. दरम्यान, खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आलेल्या भरधाव टेम्पो चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर स्वार ललिता खाली पडल्या. त्यांच्या डोक्यावरून टेम्पाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला असून निजामपुरा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, नदीनाका-मिठपाडा या रस्त्याच्याकडेला टोरेंट पावर कंपनीने केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम केले आहे. त्यामुळे येथील रस्ता अरुंद झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.