नवी मुंबई - पारंपरिक तुळशीविवाह सोहळ्याला आजपासून(शनिवार) सुरुवात होत आहे. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी नवी मुंबई शहर परिसरात लगबग दिसून येत आहे. तुळशीच्या लग्नासाठी महिला तयारीला लागल्या आहेत. दिवाळी आटोपल्यानंतर मावळलेल्या उत्साहाला पुन्हा उधाण आले आहे. बाजार चिंचा बोर, मुंडावळ्या, ऊस, हार फुले, रांगोळ्या व फटाक्यांच्या दुकानांनी सजला आहे.
हेही वाचा - अयोध्येच्या ऐतिहासिक निकालानंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया..
नवी मुंबईतील बाजारात तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सौभाग्य लेणं, नवीन वस्त्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पूजेसाठी लागणाऱ्या चिंचा, आवळा, फळे आणि फुले यांनी बाजार बहरू लागला आहे.
सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन रंगरंगोटी करून सुशोभित करण्यास सुरुवात झाली असून. त्यामुळे पूजासाहित्य, फळफळावळ, फुलांच्या खरेदीबरोबरच तुळशीविवाहाची धामधूम सर्वत्र पहायला मिळत आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबई शहरात तुलसी विवाह हा सोहळा परंपारिक पद्धतीने साजरा होतो, नियोजित तारखेपासून पाच दिवस तुलसी विवाह शहरात साजरा केला जात असून काही वसाहतीत सार्वजनिक तुलसी विवाह लावण्याची पद्धत नवी मुंबई शहरात रूढ झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा विवाहाच्या साहित्याने फुलल्या आहेत. रोपवाटिका व फिरत्या रोपविक्रेत्यांनी तुळशीच्या रोपट्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. इतके असूनही या सोहळ्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.