ठाणे - गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कल्याणात उघडकीस आली आहे. एका 42 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचारा केल्याच्या घटनेमुळे कल्याणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह लैंगिक अत्याचाराच्या कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. मुदुर तालवाला, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कल्याण पश्चिम भागातील एका उच्चभ्रू वस्तीत पीडिता कुटुंबीयांसह राहते. त्याच परिसरात आरोपी शिक्षक व त्याची पत्नी खासगी शिकवणी घरात चालवतात. याच शिकवणीत पीडित विद्यार्थिनी शिकवणीसाठी जात होती. दीड महिन्यांपूर्वी आरोपीची पत्नी माहेरी गेल्याने तो घरात शिकवणी घेत होता. त्यातच त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार सुरू केले. मात्र, दिवसागणिक हा प्रकार वाढत गेल्याने पीडितेने शिकवणी जाण्यास नकार दिला. त्यामुळे पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीवर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. गुरुवारी (दि. 23 सप्टेंबर) न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य