ठाणे - बटाटे घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने धावत्या ट्रक मधून उडी घेतली. हा ट्रक लोखंडी कठडे तोडून थेट खोल दरीत 50 फूट जाऊन कोसळला. अपघाताची घटना कसारा घाटात नर्सरी पॉंईटनजीकच्या खोल दरीत घडली. सुदैवाने चालक व त्याचा साथीदार अपघातातून बचावले आहेत.
चालकाची धावत्या ट्रकमधून उडी -
आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास इंदोरहून मुबईकडे बटाटे घेऊन ट्रक निघाला होता. त्याच सुमारास कसारा घाटातील नाशिक-मुबई लेनवर ट्रकचा ब्रेक फेल झाला. यामुळे जीव वाचविण्यासाठी ट्रॅक चालकाने स्वतःच्या बचावासाठी गाडी कसारा फाट्याकडे वळवून धावत्या ट्रकमधून खाली उडी टाकली होती. त्यामुळे ट्रक थेट मुबंई लेनवर जाऊन खोल दरीत कोसळला. सुदैवाने अपघात घडला त्यावेळी मुबई लेनवर वाहनाची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
हेही वाचा - अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग : दोषींवर कडक कारवाई होणार - मंत्री हसन मुश्रीफ
तर मोठी जीवितहानी झाली असती -
चालकाच्या निष्काळजीपणाने ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यातच धावता ट्रक सोडून देणाऱ्या चालकामुळे मोठा आपघात झाला असता. आपघातग्रस्त ट्रक दुसऱ्या लेनवर येण्याअगोदर ५ मिनिटांपूर्वी अनेक वाहने याच मार्गाने येत जात होती. दरम्यान, चालक व त्याच्या साथीदाराला किरकोळ दुखापत झाल्याने आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले आहेत. त्यांनतर आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य शाम धुमाळ, दत्ता वाताडे, मनोज मोरे, अक्षय राठोड, यांच्यासह कसारा पोलीस ठाण्याचे बाळकुर्ष्ण चौधरी घटनास्थळी पोहचले. यानंतर मदतकार्य सुरू झाले. तसेच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गजेंद्र पालवे,सलमान खतिब यांनी घटनास्थळी भेट दिली.