ठाणे - आम्हाला तळोजा जेलमध्ये का पाठवता? असे म्हणत एका कैद्याने आधारवाडी तुरुंग अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. यावेळी त्याने हाताचे ठोशे मारून काचा फोडल्याची घटना आधारवाडी कारागृहात घडली आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण रेड्डी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. कल्याण पश्चिम येथील आधारवाडी कारागृहात नारायण रेड्डी हा कैदी शिक्षा भोगत आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तुरुंग सुभेदार संतोष सालेकर यांनी नारायण रेड्डीला तुला तळोजा येथे नेण्यासाठी पोलीस पार्टी येत असल्याचे सांगितले. तोपर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्याला बसवले. काही वेळ रेड्डी शांत बसला. मात्र, अचानक आक्रमक होत रेड्डी याने मला तळोजा जेलला का पाठवता? असे विचारात केबिनच्या काचेवर ठोशे मारले. त्यामुळे केबिनच्या काचा फुटल्या. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात नारायण रेड्डीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.