ठाणे - ठाण्यातील येऊर येथील वनाधिकाऱ्यांच्या जाचाच्या विरुद्ध आज शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी कोर्ट नाका येथे रस्ता रोको आंदोलन केले. येऊरच्या डोंगरावर पारंपरिक पद्धतीने भातशेती करणाऱ्या आदिवासींची वर्षानुवर्षे कापणीला तयार असलेली भात, तूर, नागली ही सर्व पिके त्यांना न कळवता या वनाधिकाऱ्यांनी चोरासारखी अक्षरशः उध्वस्त करून लुटून नेली. या गोष्टीचा निषेध करत आज ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले.
येऊर परिसरातील शेतजमीन ही अनधिकृत असल्याचे कारण देऊन सदरच्या जमिनीतील पिके उध्वस्त करण्यात आली आणि गेले 7 महिने या क्षेत्रात झालेले ढाबे, लॉन्स, बंगले अशी शेकडो बेकायदेशीर बांधकामे मात्र अधिकृत आणि पर्यावरण पूरक आहेत का? असा संतप्त सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. या लॉकडाऊनने आधीच गरिबांचे कंबरडे मोडले आहे, त्यात आता कापणीला तयार असलेली पिके वनाधिकाऱ्यांनी अक्षरशः उध्वस्त करून लुटून नेली. त्याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी व त्या वनाधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.